स्वित्झर्लंडच्या 'स्प्रिंगर नेचर' या आंतरराष्ट्रीय प्रकाशनसंस्थेने प्रकाशित केलेल्या पुस्तकात घेतली गेलेली प्रशिक्षण कार्यक्रमाची दखल (येथे क्लिक करा)
 
English  |  मराठी 
 
     
  मिशन एन. सी. एफ. - विज्ञान शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम  
 

राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (NCF - 2005) आणि राज्य अभ्यासक्रम आराखडा (SCF - 2010) यामध्ये विज्ञान शिक्षणासाठी ज्ञानरचनावाद पद्धती असावी, यावर भर दिल्याचे आढळते. शिक्षकांनी विज्ञान शिकविताना ज्ञानरचनावाद प्रत्यक्ष वर्गात राबवावा यासाठी एन. सी. इ. आर. टी. सारख्या सरकारी संस्था, अनेक स्वयंसेवी संस्था तसेच वैयक्तिक स्तरावर अनेक व्यक्तींनी यासाठी अनेक प्रयोग, कृती, साहित्यसंच विकसित केले. अनेक शासकीय आणि स्वयंसेवी संस्थांनी वर्गात विज्ञान शिकविताना कोणते प्रयोग, कृती शिक्षकांनी कराव्यात यासाठी विविध स्तरांवर कार्यशाळांचे आयोजन केले.

या कार्यशाळांना शिक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो, कार्यशाळेत दाखविल्या जाणाऱ्या कृती, प्रयोग शिक्षकांना पसंत पडतात; पण प्रत्यक्ष वर्गामध्ये मात्र यांचा वापर अभावानेच केला जातो आहे, असे आढळले. या कारणास्तव हेमंत लागवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण-डोंबिवली परिसरातील १५ शाळांमधून एक वेगळ्या प्रकारचा पथदर्शी शिक्षक प्रशिक्षण प्रकल्प राबविण्यात आला. (प्रकल्पाचा अहवाल वाचण्यासाठी येथे क्लिक करा)

 
  या पथदर्शी शिक्षक प्रशिक्षण प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण खात्यातर्फे अशा प्रकारचा शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम 'राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियान' (RMSA) अंतर्गत संपूर्ण राज्यात राबविण्याचे निश्चित करण्यात आले. या माध्यमिक शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमासाठी हेमंत लागवणकर यांची 'प्रकल्प प्रमुख' म्हणून नियुक्ती करण्यात आली. न्यास ट्रस्ट ही स्वयंसेवी संस्था आणि राज्य विज्ञान व गणित संस्था, रविनगर, नागपूर या शासकीय संस्थेकडे या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या संयोजनाची जबाबदारी देण्यात आली. हा प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या राबविण्यासाठी स्थानिक पातळीवर 'जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था' (DIET) यांची मदत घेण्यात आली. राष्ट्रीय शिक्षण आराखड्यानुसार वर्गात विज्ञान शिक्षण व्हावे, या हेतूने आखण्यात आलेल्या या माध्यमिक विज्ञान शिक्षकांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाला 'मिशन एन. सी. एफ. २००५' असे संबोधण्यात आले.  
 
 
 
मा. शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य यांचा शुभ संदेश   मा. शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे महाराष्ट्र राज्य विधान परिषदेतील भाषण
 
 

२०१५-१६ या शैक्षणिक वर्षात प्रशिक्षण कार्यक्रमाचा पहिला टप्पा पार करण्यात आला. या टप्प्यात एकूण ४४ दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळांमधून प्रत्येक जिल्ह्यातील ३० याप्रमाणे १०६० विज्ञान शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात आले. या कार्यशाळांमध्ये प्रत्येक शिक्षकाला शासनाकडून एक प्रयोगसाहित्य संच देण्यात आला. हे साहित्य वापरून शैक्षणिक साधने स्वत: कशी तयार करायची आणि त्या साधनांचा वापर विज्ञानाच्या अभ्यासक्रमातील संकल्पना स्पष्ट करण्यासाठी वर्गात कसा करायचा याचे प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात आले.

शिक्षक प्रशिक्षण हस्तपुस्तिका (द्विभाषिक)

 
 

मिशन एन. सी. एफ. प्रशिक्षण कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्याची सहभागी विज्ञान शिक्षक आणि शासकीय अधिकाऱ्यांनी प्रशंसा केली. सहभागी शिक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा टप्पा कमालीचा यशस्वी ठरला. पहिल्या टप्प्यात प्रशिक्षित झालेल्या शिक्षकांना दुसऱ्या टप्प्यावर 'स्रोत व्यक्ती' म्हणून काम करायचे असल्याने हा टप्पा महत्वाचा होता. पहिल्या टप्प्याच्या अखेरीस राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात उत्साहाने काम करणाऱ्या ३० शिक्षकांची फळी उभी राहिली.

(मिशन एन. सी. एफ. प्रशिक्षण कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्याच्या अहवालासाठी येथे क्लिक करा)

 
 
 
 
 
 
 

शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्याच्या परिणामकारकतेचा अभ्यास केल्यानंतर २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात या प्रशिक्षण कार्यक्रमाचा दुसरा टप्पा राज्य शासनातर्फे हाती घेण्यात आला. या टप्प्यामध्ये सुमारे ४ महिन्यांच्या कालावधीत राज्यभरात ३०० पेक्षा जास्त दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आणि एकूण १२,८८६ माध्यमिक विज्ञान शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात आले. या कार्यशाळांच्या संयोजनाची जबाबदारी राज्य विज्ञान व गणित संस्था, रविनगर, नागपूर या संस्थेने जिल्हा शिक्षक प्रशिक्षण संस्थांच्या मदतीने पार पाडली. विशेष म्हणजे, पहिल्या टप्प्यात प्रशिक्षण घेतलेल्या सर्व शिक्षकांनी दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षणामध्ये 'स्रोत व्यक्ती' म्हणून काम केले. अशा तऱ्हेने या प्रशिक्षण कार्यक्रमातून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ३० स्रोत व्यक्ती या प्रशिक्षण कार्यक्रमामुळे तयार झाल्या आणि राज्यातल्या विविध शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये आपले योगदान देऊ लागल्या.

इतक्या मोठ्या प्रमाणावर शिक्षकांना प्रयोगसाहित्यासह कृतियुक्त प्रशिक्षण देण्याचा आणि हे प्रशिक्षण वर्गा-वर्गामधून प्रतिबिंबित करणारा हा देशातील पहिलाच कार्यक्रम ठरला. या प्रशिक्षण कार्यक्रमानंतर राज्यातल्या अनेक शाळांमधून अनेक शिक्षक प्रत्यक्ष कृती आणि उपक्रम दाखवून विज्ञान शिकवू लागले.

 
  (मिशन एन. सी. एफ. शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याच्या अहवालासाठी येथे क्लिक करा)  
  (मिशन एन. सी. एफ. शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाचा संक्षिप्त स्वरूपातील संपूर्ण आढावा)  
   
  इतर शैक्षणिक संस्थांनी घेतलेला पुढाकार

 

 

हा प्रशिक्षण कार्यक्रम शिक्षकांच्या पसंतीला उतरला आणि ज्ञानरचनावाद वर्गात आणण्याच्या दृष्टीने त्याची उपयुक्तता जाणवल्याने अनेक शैक्षणिक आणि स्वयंसेवी संस्थांनी या प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात पुढाकार घेतला.

• 'पश्चिम खानदेश भिल्ल सेवा मंडळ', नंदुरबार या संस्थेतर्फे चालविल्या जाणाऱ्या आश्रमशाळांमधून शिकविणाऱ्या २१ शिक्षकांसाठी १० व ११ जुलै २०१५ रोजी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

• 'काविश', मुंबई या स्वयंसेवी संस्थेने २९ व ३० ऑगस्ट २०१५ आणि १७ व १८ ऑक्टोबर २०१५ या दिवशी उर्दू माध्यमातून शिकविणाऱ्या माध्यमिक विज्ञान शिक्षकांसाठी दोन कार्यशाळांचे आयोजन केले. ५२ शिक्षकांनी या कार्यशाळांचा लाभ घेतला.

• 'प्रथम', मुंबई या स्वयंसेवी संस्थेने विज्ञान प्रसार, विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, भारत सरकार, नवी दिल्ली यांच्या सहकार्याने मुंबईच्या होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रात १४ व १५ ऑक्टोबर २०१५ रोजी एका प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले. या कार्यशाळेतून ४४ विज्ञान शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात आले.

विज्ञान प्रसार, विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, भारत सरकार, नवी दिल्ली यांच्यातर्फे आदिवासी भागांतील शाळांमध्ये शिकविणाऱ्या विज्ञान शिक्षकांसाठी या कार्यशाळा घेण्यासाठी विशेष अनुदान देण्यात आले. या अनुदानातून दिनांक १५ व १६ फेब्रुवारी २०१६ रोजी चंद्रपूर येथे आणि दिनांक २५ व २६ फेब्रुवारी २०१६ रोजी पालघर येथे शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळांमध्ये अनुक्रमे ३९ व ४६ शिक्षक सहभागी झाले होते.

 
 

आंतरराष्ट्रीय पाठ्यपुस्तकात घेतलेली दखल

 
 

विज्ञान शिक्षकांचे सक्षमीकरण करण्यासाठी राबविण्यात आलेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमाची दखल 'Social Marketing in Action' या आंतरराष्ट्रीय पाठ्यपुस्तकात घेण्यात आली. हे पाठ्यपुस्तक स्वित्झर्लंडच्या 'स्प्रिंगर नेचर' या शैक्षणिक आणि संशोधनपर पुस्तके प्रकाशित करणाऱ्या जगातील अग्रणी प्रकाशन संस्थांपैकी एक असलेल्या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केले आहे.

या पाठ्यपुस्तकात समाजाला दिशा दाखविणारे काम प्रत्यक्षात उतरविणाऱ्या वेगवेगळ्या देशांतील अनेक प्रकल्प व उपक्रमांविषयी माहिती देण्यात आली आहे. मिशन एन. सी. एफ. शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाविषयी या पुस्तकामध्ये ग्रिफिथ विद्यापीठ, नॅथन, ऑस्ट्रेलिया येथे कार्यरत असणारे प्रा. समीर देशपांडे यांनी 'Use of Social Marketing to Improve Science Teaching in Maharashtra, India: 2014–18' या नावाचा संशोधन निबंध लिहिला आहे.